मुंबई : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली आहे. सहाजिच मुंबई महापालिकेची निवडणूक (Bmc Elections 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मग या एका गाडीतल्या प्रवासाची राजकीय चर्चा तर होणारच. याप्रवासावेळी आदित्य ठाकरे अजित पावांरांच्या गाडीचे सारथ्य करताना दिसून आले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतही ही गाडी एकत्र धावणार का? अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आदित्य ठाकरे गाडी चालवत होते. या ठिकाणावरून त्या ठिकाणावर अजित दादांना जिथं जिथं कामं सुरू आहेत. त्या ठिकाणी फिरवते होते. तसेच कुठे काय सुरू आहे. कुठलं काम किती पूर्ण होतं आहे. ही सर्व माहिती खुद्द आदित्य ठाकरे अजित पवारांना हातवारे करून देत होते. अजित दादाही आदित्य ठाकरेंच्या मागोमाग चालत सर्व कामांची माहिती घेत होते. त्यामुळे राजकारणातले सिनिअर अजितदादा आणि ज्युनिअर ठाकरे यांच्यात सकाळी काय खलबतं झाली. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आदित्य ठाकरेंनी अजितदादांना कुठे कुठे फिरवलं?
1. महालक्ष्मी रेसकोर्स सायकल ट्रॅक
2. धोबीघाट
3. सातरस्ता संत गाडगे महाराज चौक नुतनीकरण
4. पोलिस कॅम्प ते वरळी सी फेस पादचारी पुलाचे नुतनीकरण
5. वरळी नरीमनभाट जेट्टीचे सुशोभीकरण
6. दादर चैत्यभूमी व्हिंविग डेक
7. माहीम रेतीबंदर बीच सुशोभीकरण
या सर्व कामाच्या ठिकाणी फिरवत आणि माहिती देत आदित्य ठाकरेंनी जणू अजित पवारांना मुंबई दर्शनच घडवून आणलं. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना अजित पवारांना पालिकेतल्या युतीबाबत विचारलं असता त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत आहेत. युतीबाबत तुम्ही जे विचारत आहेत ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील. गाडी चालवणं हे प्रत्येकाचं पॅशन असतं आणि आम्ही सगळे एकत्र काम करतो. त्यांनी गाडी चालवली म्हणून वेगळा अर्थ काढू नका. अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
आदित्य ठाकरेंवर स्तुतीसुमनं
यावेळी आदित्य ठाकरेंचं कौतुक करायला अजितदादा कसे विसरतील. फ्लायओव्हरच्या खाली चांगली कामं पालिके कडून करण्यात आली आहे. सात रस्तामध्ये देखील चांगली काम आदित्य ठाकरे यांच्या कडून करण्यात आलं आहे. माहीमच्या किल्ल्यामधील लोकांना लवकर शिफ्ट करून ती जागा पर्यटकांसाठी खुली करणार आहोत. ही काम करत असताना खूप लोकांना शिफ्ट करावं लागलं आहे. पण कोणावर अन्याय केला नाही. हा खाजगी दौरा होता आणि त्यामुळे आम्ही माध्यमांना सांगितलं नाही, असे म्हणत अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केले आहे.