मुंबई : नूतन संसद भवनाचे 28 तारखेला उद्घाटन होत आहे, त्यावरून देशभरात राजकीय गदारोळ माजला आहे. एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचे उद्घाटन होत नाही, फक्त मोदींना विरोध करायचा म्हणून या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार विरोधक करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासह देशातील भाजपच्या विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
देशाच्या नव्या संसद भवनच्या इमारतीचे उद्घाटन होत असताना विरोधकांनी मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यावरून आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हणाले की, ज्या काँग्रेसला अरविंद केजरीवाल यांनी कायम विरोध केला होता, त्याच केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊन आता त्यांना एकमेकांची गरज लागते.
त्यावरूनच भारतीय जनता पक्षाची ताकद लक्षात येते असा टोलाही त्यांनी केजरीवालांसह उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद होत आहे की, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊन आता त्यांना एकमेकांची गरज लागली आहे.
भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरिता अरविंद केजरीवाल जर कुणाशीही कॉम्प्रमाईज करायला तयार आहेत, तर उद्धव ठाकरे हे कुणासोबतही बसायला तयार आहेत.
या गोष्टीवरून भारतीय जनता पार्टीची ताकद लक्षात येते असा विश्वास त्यांनी विरोधकांना बोलून दाखवला आहे. आज जरी हे विरोधक एकत्र आले तरी 2019 मध्येही हा प्रयोग करुन झालेला आहे.
मात्र विरोधकांचा हा प्रयोग यशस्वी झाला नसल्याचे सांगत, या त्यांच्या एकजुटीवरून त्यांना आता भाजपची ताकद कळून आले असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.