मुंबई | 24 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. या सगळ्या घटनांची गंभीर दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी आज विधान परिषदे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
“१९ जुलैला राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीजनक पाऊस पडला. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये ११० नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढले. मदतीसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली”, असं अजित पवार विधान परिषदेत म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत आज राज्यातील पूरपरिस्थितीवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. पूरग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत करणार. दुकानांचं नुकसान झाल्यास 50 हजारांची मदत केली जाणार आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल.
“बुलढाणा जिल्ह्यात १०२ मिलीमीटर पाऊस पडला. तेथे नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये १३९.७ मिलीमीटर पाऊस पडला. वेगवेगळ्या जिल्ह्यात मदतकार्य पथक ही तैनात करण्यात आली”, अशी माहिती अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.
“या अवकाळी पावसात मृत पावलेल्यांना तातडीने ४ लाखाची मदत जाहीर केलीय. तातडीने पिक पंचनामेचे काढण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात घराचं नुकसान झालेल्यांना 5 ऐवजी 10 हजारांचं सानुग्रह अनुदान मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे”, असं अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितलं.
“धोकादायक परिस्थितीत असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं. पूरपरिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने 4 लाखांची मदत देण्यात यावी. शेती-पिकांच्या नुकसानीचे पंचवाने तातडीने घ्यावेत”, असे निर्देश दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
“शेतजमीन खरडून गेल्या असतील तिथे पंचनामे करुन पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी निर्णय घ्यायचा. बाधित व्यक्तींना दुकानात स्वस्त दरात धान्याचं वाटप करावं”, असेही निर्देश दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
“ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना सध्याच्या दराने 5 हजारने सानुग्रह देण्याची कारवाई सुरु करायची, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सानुग्रह 10 हजार देण्याचा आताच निर्णय घेण्यात आला”, असं अजित पवार विधान परिषदेत स्पष्ट म्हणाले.