CM Ekanth Shinde Big Action Plan : पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचा उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार होणार आहे. दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, वेगवान प्रवास आता या रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आता या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेशी संवाद साधला.
“आपण कोस्टल हायवे सुरु केलेला आहे. आता तर तो सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर अवघ्या दहा मिनिटात मुंबईकरांना गाठता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना अतिशय सुखकर आणि जलद प्रवास करण्याची संधी मिळेल. लोकांचा वेळ, इंधन वाचेल. तसेच प्रदूषणही कमी होईल. लोक घरी व कार्यालयात वेळेत किंवा लवकर पोहोचतील आणि घरी जास्त वेळ ही देऊ शकतील. मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यानंतर हा रोड पुढे वर्सोव्याला जोडला जाईल आणि त्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेत आहोत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यानंतर आता भविष्यात मरीन ड्राईव्हपासून मुंबई वर्सोवा दोन ते तीन तासाचा अंतर 40 मिनिटात पार करता येणार आहे. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. आमचा महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या ब्रीजवरून पाहिलं तर विदेशात आल्यासारखं वाटतं. हा पूल बनवण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
आम्ही या प्रकल्पात कोळी बांधवांची मागणी देखील पूर्ण केली आहे. या प्रकल्पात त्यांना न्याय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोळी बांधव गेले होते, त्याचा स्पेन वाढला पाहिजे आमच्या बोटी जाऊ शकत नाही या त्यांच्या मागण्या होत्या. मात्र त्यांनी याला नकार दिला. पण सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत आम्ही त्याला मान्यता दिली आणि यासाठीच लागणारा जास्तीचा वेळ वेगाने काम करून आम्ही पूर्ण केलं. पुढच्या दोन वर्षात जो ॲक्शन प्लॅन तयार केला आहे, त्याप्रमाणे मुंबई खड्डे मुक्त होईल. आरोग्य आणि वाहतूक कोंडीवर विविध योजना आपण करतोय, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे उद्धाटन आज करण्यात आले. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.