मुंबई: शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमात झालेल्या बोट दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या घोषणेवर ठाम आहेत. बोट दुर्घटना हा दुर्दैवी अपघात होता, मात्र त्यामुळे शिवस्मारकाच्या कामात बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यापुढे पुन्हा शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.
भूमीपूजनाला मुख्यमंत्री उपस्थित का नव्हते?
मुख्यमंत्री शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित का नव्हते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी तुम्ही कार्यक्रमाला उरकून घ्या, मी कोल्हापुरात असल्याने मला उपस्थित राहणं अवघड आहे, असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी बोट खडकावर आदळल्याने अपघात झाला. बोटचालक शॉर्टकट घेण्याच्या प्रयत्नात होता, त्यामुळे हा अपघात झाला. मात्र या दुर्घटनेनंतर शिवस्मारक प्रकल्पाला कोणतीही बाधा येणार नाही, ते काम नियोजनानुसार सुरु राहील”
इतकंच नाही तर यापुढे या स्मारकासाठी कोणतंही भूमीपूजन होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनीयावेळी जाहीर केलं.
यापूर्वी शिवस्मारकाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी झालं होतं. मात्र तरीही विनायक मेटे यांनी पुन्हा भूमीपूजनाचा घाट घातला होता.
24 ऑक्टोबर रोजी हा भूमीपूजनाचा कार्यक्रम जाहीर नियोजित केला होता. त्यासाठी विनायक मेटे आणि अधिकाऱ्यांसह चार बोट शिवस्मारक स्थळाकडे जात असताना, एका बोटीला अपघात झाला. बोट खडकावर आदळल्याने ती बुडाली. त्यावरील 24 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.