मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही नेत्यांची प्रकृती आता सुधारली असून फडणवीस आणि अजितदादांना एकाच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अनोख्या कनेक्शनची गमतीशीर चर्चा रंगली आहे. (Devendra Fadnavis and Ajit Pawar almost recover from Covid 19 may get discharge from hospital)
प्राथमिक माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडले जाऊ शकते. तर अजितदादांची प्रकृतीही ठणठणीत झाल्याचे समजत आहे. त्यांना दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या तुलनेत अजित पवार यांना कोरोनाची तितकीशी लक्षणे जाणवत नव्हती. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून आपण रुग्णालयात दाखल झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता हे जवळपास एकाचवेळी रुग्णालयात दाखल झालेले हे दोन्ही नेते एकत्रच रुग्णालयातून घरी जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. तर अजित पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगले होते. यावेळी अजित पवार यांनी सगळ्यांनाच धक्का देत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी पार पाडला होता. नंतरच्या काळात हे सरकार टिकू शकले नाही. मात्र, तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील अनोख्या कनेक्शनची राजकीय वर्तुळात कायम चर्चा असते.
देवेंद्र फडणवीसांवर झाली होती प्लाझ्मा थेरपी
देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत होते. मध्यंतरी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही खालावली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले होते. याशिवाय, फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपीही करण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
Special Report | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर प्लाझ्मा थेरपी, अजित पवारांची प्रकृती चांगली
(Devendra Fadnavis and Ajit Pawar almost recover from Covid 19 may get discharge from hospital)