मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. राज्यात महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना जोडो मारो आंदोलन केले. तर सत्तेतील लोकांनी खेटरं मारो आंदोलन केले. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरत लुटीचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आतापर्यंत सांगितल्याचा घणाघात केला. आपल्या बापाला कोणी लुटारू म्हणेल का? असा संताप त्यांनी टीव्ही9 मराठी कान्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलनात व्यक्त केला.
सुरतची लूट नाही, स्वारी
महाराजांनी सुरत लुटली नाही. स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी, तैमूरलंग जे करतो त्याला लूट म्हणतो. शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना हातही लावला नाही. महाराजांनी त्यांना पत्र दिलं होतं. खर्च द्या नाही तर मी खजिना वसूल करेल. त्यांनी नोटीस पाठवली. त्यानंतर खजिना घेतला. त्याची पावती दिली. आपल्या बापाला कोणी लुटारू म्हणेल का, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. त्यांनी स्वारी केली, महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही. त्यांनी स्वराज्याच्या खजान्यासाठी केलेली स्वारी आहे. १८५७चे बंड हे शिपायाचं बंड होतं म्हणतात. ते स्वातंत्र्य युद्ध म्हणत नाही असं म्हणणं हे म्हणणारे हे लोक आहे. महाराजांनी कधीच लूट केली नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का. हा सवाल आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझा राजाने रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू दिला नाही. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवलं. असा हा राजा होता. महाराजांनी कधीच सुरत लुटली नाही. त्यांनी स्वराज्याच्या खजिन्यासाठी स्वारी केली. त्यावेळचं ते तत्व होते. हे मोघल लुटारू होते. महाराज लुटारू नव्हते, असे ते म्हणाले.
विरोधकांचं या विषयात जे वागणं झालं ते चुकीचं आहे. ते राजकीय होतं. अशावेळी सर्वांनी संवेदनशील वागलं पाहिजे. मी राणेंचं समर्थन केलं नाही. पब्लिकली केलं नाही. पण विरोधकांनी जोडा मारो आंदोलन केलं. इतकं. इतके मोठे नेते त्या ठिकाणी हातात चप्पल घेऊन आले. आम्हाला काय फरक पडतोय. हे शोभत नाही. इतक्या खालच्या थरावर जाणं, अशी टीका त्यांनी केली.