मुंबई : फडणवीसांबद्दल पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केलीय. देवेंद्र फडणवीस फडतूस गृहमंत्री असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनीही ठाकरेंना इशारा दिलाय. ठाण्यातल्या मारहाणीच्या घटनेवरुन, उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हणत जळजळीत टीका केलीय. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची लाळ चाटणारेच फडतूस असल्याचा पलटवार फडणवीसांनी केलाय.
ठाण्यात फेसबूक पोस्टवरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंनी केलाय त्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे ठाण्यात आले. हॉस्पिटलमध्ये रोशनी शिंदेंनी विचारपूस केली. हॉस्पिटलमधून उद्धव ठाकरे ठाण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आले. पण कार्यालयात आयुक्तच नव्हते त्यामुळं ठाकरे आणखी संतापले.
मात्र काही वेळानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्केही आयुक्तालयात आले. त्यावेळी पोलीस आयुक्त जयजीत सिंग कार्यालयात उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. पण नितेश राणे आणि बावनकुळेंनीही उरली सुरली कसर पूर्ण केली. दोघांनीही उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. ठाण्यातून पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री आहे की गुंडमंत्री ? अशी टीका ठाकरेंनी केलीय.
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये याआधी सभांमधून शाब्दिक चकमक झालीय..पण फडतूस सारखी टोकाची टीका पहिल्यांदाच ठाकरेंनी केलीय. यावरुन फडणवीस आणि ठाकरेंमधले संबंध किती टोकाला पोहोचलेत हे स्पष्ट दिसतंय.