नागपूर : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विदर्भात दौरा केला. नागपुरात सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी नागपूरला लागलेला कलंक असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांचा केला होता. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी असं म्हणून देवेंद्र फडणवीस निघून गेले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुःख आहे की आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही मानसिक परिस्थिती आहे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी.
अफजलखानाच्या काळात धर्मांतर करा, यासाठी सक्ती केली जात होती. धर्मांतर करा नाहीतर कुटुंबासह मारले जालं, अशी परिस्थिती होती. तसं आता पक्षांतर करा नाहीतर जेलमध्ये जाल. अशी भाजपची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती देशाला आणि राज्याला कलंकासारखी लावू नका. हीच मला त्यांना विनंती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
कलंक या शब्दावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप लावून कलंक लावता, मग मंत्री करता. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा निशाणा साधला आहे. तुम्ही घराघरात ईडी, सीबीआय घुसवता तेव्हा ते कुटुंब कलंकित होत नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री झालेत, हे मिंध्येंच्या नाकीनऊ आलेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणणाऱ्यांना आता मिरचीही गोड लागते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.