मुंबई : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले आहे. माझ्या सलाईनमधून मला मारायचा प्रयत्न झाल्याचाही आरोप जरांगेंनी केला. जरांगे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं.कोणाचीही अडवणुक नाही. कुठल्या निरशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही. ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप असून धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ ही सुरु केली. सर्व योजनांची सुरूवात मी केल्याचं फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.