मुंबई : काही वाटेल ते झाले आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नाही आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. मुंबईत ते बोलत होते. भाजपा ओबीसी मोर्चातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय चिघळला असल्याचे ते म्हणाले. सत्तेत आल्यापासून मागील अडीच वर्षात यांना इंपिरिकल डेटाही गोळा करता आला नसल्याचा घणाघात त्यांनी केला. तर भाजपाचा (BJP) डीएनए हा ओबीसी आहे. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. भाजपाप्रणित सरकारमध्ये सर्वाधित मंत्री ओबीसी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मागासवर्ग आयोगाने सांगितले, की टर्मस ऑफ रेफरन्स दिला तर आम्ही एक ते दीड महिन्यात डेटा गोळा करून देऊ. मात्र राज्य मागासवर्गाची परवानगी न घेताच कोणता तरी डेटा राज्य सरकारने कोर्टात दिला. त्यामुळे कोर्ट भडकले. सर्व्हे कधी केला, सही सँपल काय, निष्कर्ष काय हे सांगावे लागेल, असे कोर्टाने सांगितले. सरकारने सांगितले, मुख्यमंत्र्यांना डेटा दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा संबंध काय येतो, असे कोर्टाने विचारले. त्यानंतर मागासवर्ग आयोगाने प्रेसनोट काढली. सरकारने काढलेल्या डेटाची माहिती आम्हाला माहीत नाही. आम्हाला सरकारने विश्वासात घेतले नाही, असे सांगितले. त्यामुळे या सरकारने दोन वर्ष विश्वासघाताचे राजकरण केले, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, की मुजोरी चांगली नाही पण शिकायची असेल तर या नेत्यांकडून शिकली पाहिजे. तोंडावर पडले तर बोट वर आहे, चित झाले तर पाय वर आहेत. आजही हे लोक सर्व कोर्टाने सांगूनही यांच्यातील एखादा उठतो आणि सांगतो केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राने केले तर होईल. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात? द्या ना मग केंद्राच्या हाती. चालवेल ना केंद्र सरकार आणि करूनही दाखवेल आणि तुम्हाला काय माशा मारण्यासाठी निवडून दिले, माल कमावण्यासाठी निवडून दिले की वसुलीसाठी निवडून दिले, असे सवाल त्यांनी केले.
भाजपाचा डीएनए ओबीसी आहे. भाजपाचा पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसींच्या भरवश्यावर मोठा झालेला हा पक्ष आहे. बाराबलुतेदार हे भाजपाचे मतदार आहेत. भाजपाला मानणारे आहेत. मोदी मजबूत पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांना जात नसते. पण जेव्हा विरोधक जात काढतात ते मोदीही ओबीसी समाजाचेच आहेत. त्यांनी जगात भारताला नंबर वन केले. देशातील कॅबिनेटमध्ये देशातील सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. आम्ही अलंकारिक पद्धतीने ओबीसींना स्थान देत नाही. कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो. पुष्परचनेसारखे काँग्रेस ओबीसी नेते तयार करतात, तसे आम्ही करत नाही. नेते मोठे होतात. पण समाज पुढे जात नाही. एखादा ओबीसी नेता तयार करतात त्याच्या भरवश्यावर दुकानदारी करतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.