उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून एका महिलेने तोडफोड केली. घोषणाबाजी करत तिने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला त्यांचा नाम फलक सुद्धा उखडून फेकून दिला. ही महिला मंत्रालयात विनापास घुसल्याचे समोर आल्याने विरोधकांनी एकच गोंधळ घातला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या मुद्यावरून शाब्दिक चकमक झडली. आता भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे षडयंत्र तर नाही ना ?
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवं. सर्वात प्रथम या महिलेची मानसिकता काय आहे हे तपासून तिने केलेले कृत्य कशासाठी केले.? यामागील षडयंत्र काय आणि कोणाचे हे पाहायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. सध्या फडणवीस यांच्या राज्यभर सभा आणि बैठका होत आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे ज्याला पाहवत नाही त्याने या महिलेच्या हातून तर हे कृत्य करून घेतले नाही ना, हे ही त्वरित तपासणे गरजेचे आहे, या मागे कोणाचा हात आहे हे समोर यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
विरोधकांवर केली टीका
ही महिला मंत्रालयात घुसलीच कशी? अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांना एकच सांगणे आहे की सगळे प्रवेश करतात त्याच पद्धतीने ती गेली असणार. हे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे, त्यामुळे अनेक जण कामासाठी मंत्रालयात येतात, पण प्रत्येकाच्या मनात काय चाललयं हे समजू शकत नाही. सत्यस्थिती समोर आल्यावर स्पष्ट होईलचं तरीही हा एखाद्या षड्यंत्राचा भाग तर नाही ना, याची मात्र त्वरित चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी एका महिलेनं मंत्रालयाचा पास न काढताच गेटमधून आता प्रवेश केला. ही महिला सचिव गेटमधून विनापास मंत्रालयात शिरली. पुढे ती थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहचली. तिने घोषणाबाजी करत कार्यालयात तोडफोड केली. नासधूस केली. तिने फडणवीस यांच्या नावाचा नामफलक काढून फेकला. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रं फिरली.