गेल्यावर्षी अजित पवार यांनी बंड केले. राष्ट्रवादीला खिंडार पाडले आणि महायुतीत सहभागी झाले. महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या तिखट प्रतिक्रिया महायुतीतून आल्या. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याची चर्चा रंगली. पण लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मात्र वरिष्ठांसह संघाचा सूर आणि नूर बदलला. त्यांनी अजितदादांना सोबत घेतल्याने पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला. त्यावर आता फडणवीसांनी मोठे भाष्य केले आहे.
जागा कमी आल्यावर कळतं की…
90 टक्के कार्यकर्त्यांना माहित आहे आपल्याला काही मिळणार नाही. पण तो विचारासाठी काम करतो. नवीन मित्र आल्याने काहींना आवडलं काहींना आवडलं नाही. पण आपण खुर्चीसाठी काही केलं नाही. राष्ट्रवादीला सोबत घेतल हे खरं आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. निवडणुकीत कमी जागा मिळाल्या वर कळत कि पक्षाचा कोण, खरा कोण, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सरकार तर महायुतीचेच येणार
यावेळी विधानसभेत अडीच कोटी मत घेणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री कोण होणार हे आज विचारू नका, असे सुद्धा ते म्हणाले. तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. आज घोषणा करतो कि भाजप राज्यातील मोठा पक्ष असेल. महायुतीच सरकार नक्की येणार, असा मोठा दावा फडणवीस यांनी केला.
आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांनी टोचले कान
आज राज्यात समाजामध्ये दुफळी तयार केली जात आहे. काहींना वाटते आम्ही असे केले तर निवडून येऊ याचमुळे पेट्रोल टाकले जात आहे. अरे निवडणुका येतील जातील पण दुफळी निर्माण करू नका. चार वेळा पवार मुख्यमंत्री होते मग आरक्षण का दिले नाही. शरद पवार चार वेळा म्हणाले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतासाठी दुफळी निर्माण करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.
सुप्रीम कोर्टात देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं तुम्ही का नाही टिकवले, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही अण्णा साहेब पाटील मंडळ तयार केले आणि तरुणांना उद्योग दिलेत. मनोज जरांगे याना माझा सवाल नाही माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आहे. समाजासाठी कितीही शिव्या खाव्या लागल्या तरी चालतील पण तुमचा बुरखा फाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.