मुंबई महापालिकेत लक्षवेधी काम करणारे करणारे नेते रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. आज देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. निवडणूक काळात रवी राजा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी बड्या राजकीय भुकंपाचे संकेत दिलेत. काही चांगले पक्षप्रवेश हे भाजपमध्ये होऊ शकतात. तुम्ही त्याची वाट पाहा. आज मला विचारू नका. असे फटाके सुरू राहतील. रवी राजांच्या संपर्कात अनेक लोक आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. येणाऱ्या काळात ते आमच्यासोबत येतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी पालिका गाजवली, मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते. पाच टर्म महापालिकेत निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावाने आहे, २३ वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केलं. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितलं जातं. जनसंपर्क असलेला नेता. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. आम्हाला रवी राजा यांचा फायदा होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल. त्यांच्या माध्यमातून आमच्या संपर्कात अनेक लोक येत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेल. पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी रवी राजा आहे. रवी राजा यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. सायनमध्ये त्यांचं काम मोठं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार तमिल सेल्वन यांना फायदाच होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणाले.
जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली. अजितदादा, बावनकुळे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. आम्ही सर्व इश्यू संपवले आहेत. ते इश्यू शिल्लक नाही. त्याचं प्रत्यंतर दिसेल. सर्व अर्ज मागे घेतले जातील. काही ठिकाणी एकमेकांच्या उमदेवारासमोर लोकं उभे आहेत. त्याबाबतही नीती तयार केली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
ज्यांनी तिकीट नसताना उमेदवारी भरली त्यांना अर्ज मागे घेण्यास लावणार आहे. पक्षांतर्गतही बंडखोरी झाली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांनाही अर्ज मागे घ्यायला लावू. आमचे सर्व अर्ज वैध झाले आहे. दिवाळी दोन दिवस आहे. साधारण ४ ते ५ तारखेने जोराने प्रचार सुरू होईल, असं फडणवीस म्हणाले.