महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुती बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापन झालेली नाही. त्यामुळे राज्यात नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार? याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात सध्या मुख्यमंत्रिपदााबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेला लवकर उत्तर मिळेल. चर्चा चालू आहे. आधी मुख्यमंत्री ठरेल मग ते मंत्री ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. आमच्या श्रेष्ठींशी सर्वांशी चर्चा सुरू आहे . लवकरच आपल्याला उत्तर मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? यावर बोलताना आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री हे मंत्री ठरवतील. आधी मुख्यमंत्र्यांची वाट पहावी, नंतर मंत्र्यांची वाट पाहावी, असं फडणवीस म्हणावे.
ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलं आहे. यावर फडणवीसांनी भाष्य केलं. याचे उत्तर काल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तुम्ही हारले म्हणजे ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे. ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे. हा रडीचा डाव आता बंद करायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यात शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत काय बोलणार? हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे आज ठाण्यात आणि संध्याकाळी मुंबईत आमदारांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपासून शिंदे यांनी भेटीगाठी नाकारल्या होत्या. आता दुपारनंतर एकनाथ शिंदे ठाण्यात काही आमदारांना भेटणार आहेत. यानंतर ६ वाजता ते वर्षा बंगल्यावर येणार आहेत.