देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीविरोधात आज तुफान बॅटिंग केली. लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आधारे त्यांनी विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. विरोधकांनी फेक नरेटीव्ह पसरविल्याचा आरोप त्यांनी केला. पण खोटं फार काळ टिकत नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसल्याचे दिसून आले. त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला पण सांगून टाकला. महाविकास आघाडीच्या आरोपांना न घाबरता थेट उत्तर देण्याचा आदेशच त्यांनी दिला.
खोट्याचा फुगा आम्ही फोडला
मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली. पण एक खोटा नरेटीव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार, असे खोटे सांगण्यात आले. खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली. विधान परिषदेत आम्ही टाचणी लावली आहे.हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असा चिमटा फडणवीसांनी काढला.
विरोधक तर लबाड
विरोधकांना पुन्हा एकदा सत्तेत येऊन आपल्या सर्व योजना बंद करायच्या आहेत. आपण लाडकी बहीण योजना आणली. विरोधक किती लबाड आहेत बघा या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपलं लावतात. माझे कार्यकर्त्यांना सांगणे आहे की ही योजना आपली आहे. आपल्या लोकांनी महिलांचे अर्ज भरून घ्यावे. विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारला ते द्यायचे नाही. ही योजना काही फसेल यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.
काय दिला फॉर्म्युला
आमच्या मुलींना उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफ होणार आहे. नरेटीव्ह तयार होतो पण आपले लोक उत्तर देत नाही. आपले लोक उत्तर देत नाही आदेशाची वाट बघतात. मी आज आदेश देतो फुल बॅटिंग करा. आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा. फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका, असा फॉर्म्युलाच जणू त्यांनी दिला.