मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे. ही घटना योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. (BJP leader Devendra Fadnavis on Mumbai Police interrogate bruck pharma owner)
ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ब्रुक्स फार्मा कंपनीने आपल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स ही कायद्याचे पालन करुन दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली होती, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा
(BJP leader Devendra Fadnavis on Mumbai Police interrogate bruck pharma owner)