मुंबई : टीव्ही9 मराठीच्या ‘लोकसभा महासंग्राम’ या विशेष या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. यादरम्यान उद्धव ठाकरेंना भाजपने खरोखरच ऑफर दिल्याचा दावा याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना राऊत बेशुद्ध आहेत. शुद्ध आली नसल्याचं म्हणत दावा फेटाळून लावला.
अजुही राऊत बेशुद्ध आहेत. शुद्ध आली नाही. अजूनही त्यांना भास होतात. अजूनही असे स्वप्न पडतात. आश्चर्यच आहे हो. एक तर बघा आमच्याकडे दिल्लीत जाळं घेऊन फिरणारे नेते नाहीत. राज्यातील काही विषय असेल तर मला विचारलं जातं. अजून दिल्लीत माझी पत आहे. उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का असं मला अजूनही विचारलं गेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारंचं जाळं टाकण्यात आलं आहे, असं स्वप्न संजय राऊत यांना पडलं असलं तरी मला वस्तुस्थिती वाटत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बाळासाहेबांवर जो विश्वास होता, तो जनतेने उद्धव ठाकरेंवर टाकला होता. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीच विश्वास उडाला. मतभेद संपवता येतात. मनभेद संपवणं कठिण असतात. जीवनात मतभेद झाले तर तो विषय बाजूला ठेवून काम करता येतं. पण मनभेद झाले तर काम करता येत नाही. रोज मोदींवर त्यांनी टीका केली. आमच्यावर टीका केली. टार्गेट केलं. या सर्व गोष्टींमुळे मनभेद झाल्याचं फडणवीस म्हणाले.
आमचे संबंध राज ठाकरेंशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असं नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही. त्यांचे आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमची युती होणार आहे. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी स्थिती यायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.