मुंबई: हुतात्मा स्मारकावर येऊन राजकीय स्टेटमेंट देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. आज महाराष्ट्र (maharashtra) दिवस आहे. काही लोक या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी नाही. त्यामुळे राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही. काही लोकांना कुठेही राजकीय प्रतिक्रिया देण्याची सवय असते. आम्ही ते करणारे नाहीत. हे हुतात्मा स्मारक आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर येऊन फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) आणि इतर आमदारही उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र कला दालन दुर्लक्षित असल्याकडेही देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र कला दालन दुर्लक्षित असेल तर त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सभा होणार आहे. भाजपच्या या बुस्टर डोस सभेतून फडणवीस आज कुणा कुणाला डोस देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही सभा होत आहे.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे 2020 मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला 30 एप्रिल 2022 रोजी एक तप पूर्ण झाले आहे. 2800 चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.