मुंबई : कर्नाटकात फटका बसल्याने भाजप आतापासूनच राज्यात तयारीला लागल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला फटका बसण्याची शक्यत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या शिंदे-बैठकीनंतर राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीसारखा पक्षामध्ये उभी फूट पडल्याने आता राज्यातील राजकारणात नवं समीरकरण दिसणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री मात्र फडणवीसही उपमुख्यमंत्री असल्याने राज्याचे आता दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असून त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन वाद झाला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण अवघ्या 72 तासातच हे सरकार कोसळलेलं. यानंतर काही महिन्यातच महाविकास आघाडी स्थापन झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी सरकार बनवलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. भाजपला सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नाही, याची खंत अनेक वेळा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. काही काळानंतर शिंदेनी बंड करून शिवसेना फोडली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप-शिवसेना सरकारमध्ये फडणवीसांनी सामील होणार नसल्याचे जाहीर केलं होतं. बाहेरून सरकारला माझा पूर्ण पांठिबा असल्याचे फडणवीस म्हणाले होते. पण, काहीवेळानंतरच थेट भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माध्यमांसमोर येत फडणवीस सरकारमध्ये थेट सामील होणार असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानाव लागलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने, सरकारमध्ये अनेक बडे नेते असणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता सरकारमध्ये दोन-दोन उपमुख्यमंत्री झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.