दोन महत्त्वाच्या बैठका, महत्त्त्वाचे निर्णय होणार, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष

| Updated on: Nov 24, 2024 | 12:33 PM

Mahayuti Meeting After Vidhansabha Election 2024 Result : काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज दोन महत्त्वाच्या बैठका होत आहे. महत्त्त्वाचे निर्णय होणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

दोन महत्त्वाच्या बैठका, महत्त्त्वाचे निर्णय होणार, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. देवगिरी निवासस्थानी थोड्याच वेळात अजित पवारांच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बैठकीत अजित पवारांनी मोठ्या संख्येने आमदार निवडून आणल्याबद्दल अभिनंदनचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. याच बैठकीत प्रतोद अनिल पाटील यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गटनेता निवडीच्या प्रस्तावावर चर्चा होईल आणि विधानसभेच्या गटनेत्याची निवड केली जाईल. अजित पवार यांनाच पुन्हा एकदा आमदारांच्या माध्यमातून गटनेता म्हणून निवडून देण्याची दाट शक्यता आहे.

सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभूतपूर्व यश राष्ट्रवादी पक्षाला मिळाले. राज्यात नवीन पर्व उदयास आला आहे. आजच्या बैठकीत नेता निवडीची प्रक्रिया पार पडेल. मुख्यमंत्री पदाबाबत अजून अशी काही चर्चा झाली नाही. काल विजयाचा आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला. सत्ता स्थापनेच्या घडामोडी 48 तासात पूर्ण होईल, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यात महायुती सरकार आलं आहे. तर मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाईल? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा कार्यकर्त्याची अपेक्षा आहे मात्र अंतिम निर्णय भाजपचे नेते घेतील. ज्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला त्यांना देखील आम्ही बोलावले आहे. विधानपरिषदेच्या आमदारांना देखील आज आम्ही बोलावले आहे, असं तटकरे म्हणाले.

शिवसेना शिंदे गटाची आज बैठक

शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींची आज मुंबईतील ताज लॅंड्स हॅाटेलमध्ये बैठक होणार आहे. विधान सभा निवडणुकीत शिवसेनेचे निवडुण आलेले नवनिर्वाचीत उमेदवार या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. सकाळी ११:३० वाजता ही बैठक ताज लॅंड्स हॅाटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडला जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडी नंतर नव नियुक्त गट नेता महायुतीच्या सहकारी पक्षांच्या गटनेतासोबत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे निवेदन प्रस्ताव सादर करणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील ताज अॅन्ड लॅड्स मध्ये आतापर्यंत 29 आमदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हॉटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. राजेंद्र गावित, किशोर आप्पा पाटील, गुलाबराव पाटील, राजेश मोरे, राम रेपाले, कृपाल तुमाणे हे नवनिर्वाचित आमदार शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित आहेत.