नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल, मुंडे-प्रफुल्ल पटेलांवर मोठी जबाबदारी? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे?

| Updated on: Apr 18, 2023 | 11:51 AM

राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या विधानभवनाच्या दिशेने निघाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल, मुंडे-प्रफुल्ल पटेलांवर मोठी जबाबदारी? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनिल काळे, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातला (Maharashtra Politics) सत्तासंघर्ष आणखी नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार सध्या बंडखोरीच्या निर्णयाप्रत आल्याचं दिसून येतंय. अजित पवार सध्या मुंबईत विधानभवनात आहेत. तर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही एकानंतर एक असे विधानभवनात दाखल होत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले धनंजय मुंडे हे अचानक विधानभवनात दिसून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे हे पहाटेच्या शपथविधीवेळीही अजित पवारांसोबत होते, असं सांगण्यात येतंय. आज पुन्हा एकदा भाजपसोबत मोटबांधीच्या चर्चा सुरु असताना धनंजय मुंडे विधानभवनात दाखल झाले आहेत.

धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी?

अजित पवार लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपात शामिल होतील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं आतापर्यंतच्या घडामोडींतून समोर आलंय. आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्रही तयार करण्यात आलंय, फक्त आता योग्य वेळ आली की हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार, असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे आमदारांना फोन करून सदर राजकीय घडामोडींसाठी तयार करण्याची मोठी जबाबदारी धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर?

अजित पवार लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या चर्चा सुरु असतानाच एक मोठा संकेत समोर आलाय. अजित पवार यांच्या ट्विटर हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा वॉलपेपर गायब झालाय. त्याऐवजी ब्लँक जागा दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार सोडचिठ्ठी देतील, या चर्चा आहेत ,असे दावे करणाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा इशारा आहे. सोशल मीडिया हँडल हीच सध्याच्या काळातली महत्त्वाची ओळख मानली जाते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचं वॉलपेपर निघाल्यामुळे राजकीय चर्चांना पुष्टी मिळतेय.

अजित पवार काय म्हणाले?

राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या विधानभवनाच्या दिशेने निघाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान ,अजित पवार यांनीी कोण काय बोलतंय, याने मला काहीही फरक पडत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मी बांधिल नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.