मुंबई: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar )यांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत (Dr. Babasaheb Ambedkar memorial)मोठी घोषणा केली आहे. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे यांनी केली आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावेळी झालेल्या छोटेखानी समारोहात धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. (Dhananjay Munde’s assurance about Babasaheb Ambedkar memorial)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन दिलं आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनामुळे काही अडचणी आल्या आणि त्यामुळे काम रखडलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे आणि आमदार सुनील शेळके उपस्थित होते. ‘बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार 2023 पर्यंत उभारेल’, असा दावा सुळे यांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट असेल. या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा 100 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.
स्मारकाच्या निधीतही 400 कोटींची वाढ केली असून आता एकून 1100 कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.
या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.
चैत्यभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी महत्वाची जागा आहे. त्याच्या समोरच ही इंदू मिलची जागा आहे. त्याठिकाणी आंबेडकरांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी 2003 पासून करण्यात येत होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्मारकाचा उल्लेख केला होता. मात्र, स्मारकासाठी प्रत्यक्ष 2012 मध्ये जागेची घोषणा करण्यात आली. (Dhananjay Munde’s assurance about Babasaheb Ambedkar memorial)
2014 मध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी रामदास आठवले यांच्याकडे देण्यात आली. तत्कालिन वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयासह विविध विभागांच्या परवानग्या 2015 मध्ये मिळाल्या. त्यानंतर 2018 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी स्मारकाच्या कामासाठी 2 वर्षाची मर्यादा आखण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिकेने वाडिया रुग्णालयाचे 98 कोटी रुपयांचं अनुदान थकवल्यानं हे रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर होतं. तशा बातम्या जानेवारीमध्ये सुरु होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती. “इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू’, असा टोला रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला लगावला होता. काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचं काम करत असल्याचा आरोपही आनंदराज आंबेडकर यांनी केला होता.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत अनेकदा तारखा देण्यात आल्या आहेत. 2 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी 14 एप्रिल 2020 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याची घोषणा केली होती. स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार असल्याचंही अजित पवार म्हणाले होते.
इंदूमिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा 18 सप्टेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र एमएमआरडीएकडून कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
संबंधित बातम्या:
‘इंदू मिलची जागा मोदींमुळेच’, पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून का? : देवेंद्र फडणवीस
Dhananjay Munde’s assurance about Babasaheb Ambedkar memorial