मुंबई : एका तरुणाने केलेल्या धूम मचा ले.. स्टाईलने केलेल्या खतरनाक स्टंटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी ) परिसरात ही घटना घडली. एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या बाईकवर दोन तरुणींना बसवून धूम स्टाईल स्टंट केला. यातील एक तरुणी त्या तरुणाच्या बाईकवर पुढील बाजूस तर दुसरी तरुणी त्याच्या मागे बसली आहे. त्या तरुणाने आपली बाईक हवेत उडवताच पुढे बसलेली तरुणी जोराने हातवारे करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
एका तरुणाने आपल्या बाईकवर दोन तरुणींना बसवून बीकेसी येथील रस्त्यावरून स्टंट केला. त्यांच्या या स्टंटचा व्हिडीओ खुपच व्हायरला झाला. हा व्हिडीओची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. त्या तरुणाला पकडण्यासाठी पोलसांची एक टीम तयार केली. आणि खबरीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली. फयाज कादरी असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा नेहमीचा गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधीही अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी अतिशय धोकादायक स्टंट करत असून त्याच्यासोबत बसलेल्या दोन मुलीही हसत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये काही गाणी वाजवली जात आहेत. त्यामुळे आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी बनवल्याचे स्पष्ट झाले आहे.
#WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police
(Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A
— ANI (@ANI) April 2, 2023
फयाज कादरी याला प्रसिद्ध व्हायचे होते. यासाठीच त्याने अशी स्टंटबाजी करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या धोकादायक स्टंटमुळे दोन्ही मुलींचा जीव गेला असता, असे पोलिसांनी सांगितले. कादरी याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या तो तुरुंगात आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कल्याण परिसरात बर्वे रोडजवळ, रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयाजवळ एका कारने दुचाकीला आणि काही वाटसरूंना धडक दिल्याची घटना घडली. यात घटनेत एका ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य ३ जण जखमी झाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून कार मालकाचा शोध घेत आहेत.