यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत का, अमोल मिटकरी यांनी सुनावलं

| Updated on: Dec 14, 2022 | 9:53 PM

यावर प्रवीण दरेकर म्हणाले, वाद-विवाद वाढविण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहे.

यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत का, अमोल मिटकरी यांनी सुनावलं
अमोल मिटकरी
Follow us on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. दोन्ही राज्यातील सीमावादावरून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, गोविंदाग्रजांनी मंगल देशा पवित्र देश, महाराष्ट्र देशा, असं राज्याचं वर्णन केलं आहे. पण, दिल्लीतील बैठकीतून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्यासोबत जवळीकता दिसत होती. महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबडेकरांचा महाराष्ट्र म्हणतो. ढाण्या वाघाचा महाराष्ट्र म्हणतो. पण, दिल्लीत लाचारी उभी केल्याचं चित्र होतं. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

दिल्ली भेटीत महाराष्ट्राला दूर लोटल्याचं दिसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्याशी जवळीकता दिसत आहे. महाराष्ट्राची लाचारी दाखविण्याचं काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून बैठकीत झाल्याचा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला.

या बैठकीतून कोणताही तोडगा निघणार नाही. जे बोम्मई यांच्या मनात आहे, जे भाजपच्या मनात आहे, तेच होईल. सीमावादाचा प्रश्न पेटत राहील. मराठी माणसांवर हल्ले आणि अन्याय सातत्यानं होत राहील, असंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

बोम्मई हे शरणागती घेणार नाहीत. महाराष्ट्राची लाचारी दाखविण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत गेलेत का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केलाय.

यावर प्रवीण दरेकर म्हणाले, वाद-विवाद वाढविण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहे. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. ४० दिवस एकनाथ शिंदे सीमालढ्यात जेलमध्ये जाणारे आहेत. सीमावादात तेल टाकण्याचं काम विरोधकांकडून केलं जातंय.