मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार हे कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण, त्याआधी ठाकरे गटाचं टेंशन वाढलंय. येत्या २३ जानेवारी रोजी ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत संपते. पुन्हा ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर बसविण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. शिवसेना कुणाची यावर ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलंय. कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निर्णय घेण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. पण, अशी मागणी हास्यास्पद असल्याची टीका शिंदे गटाने केली आहे.
पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपण्यापूर्वी पक्षाची निवडणूक घ्यायला परवागनी द्या. यावर काही आक्षेप असेल, तर पक्षप्रमुखपद सुरू राहील. अशी परवानगी द्या, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं.
निवडीसाठी जी परवानगी मागितली आहे. ती हास्यास्पद वाटत असल्याचं शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हंटलं. २८२ पैकी १७७ सदस्य हे आमच्याकडं आहेत. मुळात आधीची जी कार्यकारिणी होती ती बेकायदेशीर होती, असं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं होतं.
२३ जानेवारीला तसं काही होणार नाही. असं काही झाल. तर त्यावर आमचा आक्षेप राहील. असं शिंदे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. त्यांच्याकडं फक्त १५ आमदार आणि पाच खासदार उरले आहेत. त्यामुळं त्यांना दिवास्वप्न पाहू नये, असं भरत गोगावले म्हणाले.
स्थापनेपासून शिवेसेनेची धुरा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती. त्यांच्यानंतर ही धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडं आली. १७ नोव्हेंबर २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होते. २००३ मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष करण्यात आलं.
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी पक्षप्रमुख पद निर्माण करण्यात आलं. २०१३ पासून आतापर्यंत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत.
घटनेप्रमाने कार्यकारिणी पाच वर्षानंतर पद संपुष्ठात येते. म्हणून उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून राहू शकत नाही, हा शिंदे गटाचा दावा योग्य असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.