मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. राज्यातील नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार देखील अद्याप पार पडलेला नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांसाठी अनपेक्षित अशी बातमी समोर आलीय. ही बातमी म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यातील पहिल्या वादाच्या ठिणगीची. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन वाद सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आमदार राणा पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत समर्थक यांच्यात वाद सुरू झालाय. आमदार राणा यांना कुणाची फूस? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस की भाजपमधील कुणाची? असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय.
राज्याचे आरोग्य मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत निधी वाटपाबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केलाय. त्यामुळे आमदार राणा पाटील यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केलाय. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा इशारा सावंत यांच्या समर्थकांनी दिलाय.
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनेचा सर्वाधिक निधी वाटप झाला. त्यामुळे इतर तालुक्यांना निधीचे वाटप असमतोल प्रमाणात झाल्याचा आरोप तुळजापूरचे भाजप आमदार राणा रणजितसिंग पाटील यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवून निधी वाटपात अन्याय झाल्याची तक्रारही केली होती. आमदार राणा पाटील यांच्या या आरोपांची दखल घेत नियोजन विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला होता. मात्र, या खुलासामधून आमदार राणा पाटील यांच्या मतदारसंघाला जास्त निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भाजप आमदारांचा बोलविता धनी कोण याची जोरात चर्चा सुरु झाली आहे.