राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांसोबत जागा वाटपही सुरू केलं आहे. हे जागा वाटप सुरू असतानाच निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपने शिंदे गटाच्या जागा बळकावण्याचं सत्र सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटात भाजपविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्या कारणांमुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती महायुतीत व्हायला लागली आहे. आमचे मतदारसंघ धोक्यात आले आहेत, अशी भावना शिंदे गटाच्या खासदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने शिंदे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या जागा घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघाचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सर्वे निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मतदारसंघ हातचा जाऊ शकतो, असं कारण देत भाजप या जागा बळकावत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याचंही या नेत्यांच म्हणणं आहे. शिंदे गटाच्या या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी नाराजी व्यक्त केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
अमरावती घेतली, नाशिकचे काय?
अमरावतीची जागा शिवसेनेकडे होती. आनंदराव अडसूळ हे शिवसेनेतून पाचव्यांदा निवडून आले होते. गेल्यावेळी नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र, पक्षातील फुटीनंतर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आहे. नवनीत राणा भाजपमध्ये येणार असल्याचं सांगून ही जागा भाजपने स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे अडसूळ प्रचंड संतापले आहेत. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहे. मात्र, त्यांची जागाही धोक्यात आली आहे. त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. ही जागा भाजप आणि राष्ट्रवादीलाही हवी आहे. त्यामुळे गोडसे यांची सीट धोक्यात आली आहे.
सर्व्हेवर जाऊ नका
दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्व्हेवर एवढं अवलंबून नसतं. मागच्या विधानसभेत प्रशांत किशोर यांनी सर्वे केला होता. त्यात माझी जागा सी कॅटेगिरीत दाखवली होती. मग मी निवडून कसा आलो? दोन निवडणुकीत जेवढी लीड नव्हती त्यापेक्षा जास्त मतांनी मी विजय झालो. त्यामुळे सर्व्हेवर अवलंबून राहू नका. मध्यप्रदेश आणि झारखंडचा सर्व्हे काय होता? सर्व्हेवर गेलो तर सत्ता गेल्यात जमा होत्या. या सर्व्हेला प्रत्येकवेळी कारण दाखवता येत नाही. तो सँपल सर्व्हे असतो. तो काही परिपूर्ण सर्व्हे नसतो. त्या सर्व्हेच्या आधारे उमेदवाराला डावलणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्व्हेवर जाऊ नका, ग्राऊंड लेव्हलच्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले.
भाजप कोण ?
आमच्या पक्षाचा निर्णय घेणारं भाजप कोण? भाजप त्यांच्या पक्षाचा निर्णय घेत आहे. आमच्या पक्षाचा निर्णय घेत नाही. एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचा निर्णय घेत आहे. शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. भाजप ढवळाढवळ करतात यात तथ्य नाही. आम्ही आमच्या लोकांचा निर्णय घेणार. भाजपचा निर्णय जसा आम्ही घेऊ शकत नाही, तसे ते आमचा निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
काही कारणं असतील
भाजपच्या लोकांचे तिकीट कापलं जात आहे. त्याला काही कारणं असतील. एखाद्या उमेदवाराला तिकीट दिलं म्हणजे त्याच्या अंतापर्यंत तोच उमेदवार राहील असं नाही. कालचक्र ही फिरत असतं. फिरत राहील. शिवतारे प्रकरण संपलं. अशा अनेक प्रकरणाचे निकाल कालच्या बैठकीत लागले आहेत. आज एक यादी जाहीर होईल. नंतर दुसरी यादी जाहीर होईल. आता चर्चा थांबल्या आहेत. उमदेवारी जाहीर होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.