मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती समोर येतेय. पक्षाचे उपनेते विठ्ठल गायकवाड (Vitthal Gaikwad) आणि सुहास सामंत (Suhas Samant) यांनी काही मुद्दे मांडले. पक्षाच्या नेत्यांपुढे काही प्रश्न उपस्थित केल्याने हा वाद झाला. या वादानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी समज दिली. वाद टाळून काम करा, अशी समज उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या उपनेत्यांना दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज उपनेत्यांची बैठक बोलावली. त्याचवेळी ही खडाजंगी झाली. विठ्ठल गायकवाड आणि सुहास सामंत यांनी पक्षाच्या नेतृत्वापुढेच काही प्रश्न उपस्थित केले.
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला उपनेते पद देण्यात आलं आहे. पण पक्षासाठी आमचा उपयोग केला गेला नाही. पक्ष संघटनापर्यंतच आम्हाला ठेवलं”, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी “उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढली. वाद टाळा आणि पुढे काम करा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“मी 2017 साली शिवसेनेत प्रवेश केला. मला पक्षाचा उपनेता केले. पण मी ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कामगार संघटनेचे नेतृत्व करतो त्याबाबतीत पक्षासाठी माझा काय उपयोग करून घेतला?”, असा सवाल विठ्ठल गायकवाड यांनी केला.
“बेस्टच्या इलेक्ट्रिक कामगार संघटनेत श्रीकांत सरमळकर यांचा पुतण्या कुणाल सरमळकर यांच्या कामगार संघटनेला पक्षातीलच एका नेत्याने समांतर मदत केली. आणि त्याची युनियन अधिकृत असल्याचे चित्र निर्माण केले गेले”, असं विठ्ठल गायकवाड म्हणाले. (कुणाल सरमळकर आता शिंदे गटात गेले आहेत)
बेस्ट कामगार संघटनेचे नेते सुहास सामंत यांनीही या मुद्याला दुजोरा देत आपल्यालाही असाच अनुभव आल्याचे सांगत विठ्ठल गायकवाड यांच्या सुरात सूर मिसळला.
विठ्ठल गायकवाड यांच्या कामगार संघटनेला अजूनही अॅफिलेशन मिळाले नसल्याचा मुद्दा बैठकीत निघाला.
शिवसेना प्रणित कामगार संघटनांच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद आणि गोंधळ बैठकीत उद्धव ठाकरेंच्या देखत घडत होता. खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते.
वाद वाढतच गेल्याने उद्धव ठाकरेंना या प्रकरणात हस्तक्षेप करीत उपनेते विठ्ठल गायकवाड आणि सुहास सामंत यांना समज द्यावी लागली. या बैठकीत सुभाष देसाई यांनी पक्षाचे उपनेते काय काम करतात? असा मुद्दा आपल्या निवेदनात विचारला.