मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा, नाहूर आणि नाहूर स्थानकातील होम फलाटाच्या शेजारी आणखी एक फलाट बांधण्याची रेल्वेची योजना आहे. त्यामुळे गर्दीत या फलाटावर दोन्ही दिशेने लोकलमध्ये चढता आणि उतरता येणार आहे.
दिवा स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर लोकलमध्ये चढण्या आणि उतरण्यासाठी दुतर्फा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवासारख्या प्रचंड गर्दी असणाऱ्या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिवा पाठोपाठ विद्याविहार, नाहूर या स्थानकातील होम प्लॅटफॉर्मच्या शेजारी आणखी एका प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलची गर्दी विभागण्यास मदत मिळणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दिवा स्थानकात दररोज सरासरी 2,24,852 प्रवासी तर नाहूरमध्ये 61,444 आणि विद्याविहार स्थानकात सरासरी 57,443 प्रवासी दररोज येजा करीत असतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसंख्या वाढल्याने दिवा स्थानकात प्रचंड गर्दी होत असून जानेवारी 2015 मध्ये प्रवाशांनी या स्थानकात रेल रोको आंदोलन करीत तोडफोड केली होती. त्यानंतर येथे काही जलद लोकलना थांबा देण्यास सुरूवात करण्यात आली. तरीही येथून दिवा लोकल सोडण्याची मागणी काही पूर्ण करण्यात आलेली नाही. या डबल डिस्चार्ज फलाटांसाठी ब्लॉक घेऊन अभियांत्रिकी काम करावे लागणार आहे. त्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.