कल्याण-डोंबिवली पालीका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर, पाहा किती मिळणार बोनस

| Updated on: Nov 03, 2023 | 3:15 PM

दिवाळी तोंडावर आली असताना कल्याण-डोंबिवली महानगर पालिका आणि उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना यंदाचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे.

कल्याण-डोंबिवली पालीका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर, पाहा किती मिळणार बोनस
KDMC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 18 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 16 हजार बोनस जाहीर करण्यात आला होता. यंदा बोनसमध्ये दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, उल्हासनगर पालिकेने देखील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 18 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय महानगर पालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी जाहीर केला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा बोनस दोन हजार रुपयांनी जास्त आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या पत्रानंतर बोनसचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, घनकचरा संबंधित स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाकडे कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेने चार प्रस्ताव सादर केले होते. त्या प्रस्तावाला काल मान्यता मिळाली आहे. एकूण 99 कोटीचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यात सीएनजी, आरडीएफसह इतर दोन प्रस्तावही झाले मंजूर झाले असून लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली.

उल्हासनगर पालीका कर्मचाऱ्यांना 17,500 बोनस

उल्हासनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 17,500 सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. पालिकेच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे पालिकेवर तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सानुग्रह अनुदानामध्ये वाढ झाली आहे. राज्यातील इतर ‘ड’ वर्ग महापालिकेच्या तुलनेत हा बोनस सर्वात जास्त असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे ठेकेदार देखील दिवाळी गोड जाण्यासाठी थकीत बिलाची मागणी करणार आहेत.

मुंबई महानगर पालीका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई महानगर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दिवाळी बोनस आणि इतर मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. मुंबई महानगर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 2019 पासून वेतन वाढ, बोनस तसेच रजा न मिळत नसल्यामुळे तसेच सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांना वेतन तसेच बोनस न मिळाल्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.