दिनेश दुखंडे,मुंबई | 5 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच भाजपवर तोफ डागली. दिल्लीत तातडीने इंडिया आघाडीची बैठक होत आहे. अर्थात या बैठकीला विधानसभा निवडणुकीतील हाराकारीची किनार आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोंडसूख घेतले. शिवसेना किती फोडा, प्रशासनातून बाहेर काढा. शिवसेना संपलेली नाही असे ते म्हणाले. त्यांनी या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा समाचार घेतला. त्यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? काय दिले त्यांनी आव्हान? इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच त्यांच्या टीकेला धार आली.
एक निवडणूक बॅलेटवर
पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आता मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या, असा टोला त्यांनी मोदी सरकराला हाणला. तुमची एवढी लाट आहे तर एकच लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. दम असेल तर मतदारांची शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. साधी सिनेटची निवडणूक लांबवता तिथे वेळ जात नाही का. मग लोकसभेची मतमोजणी करण्यासाठी वेळ गेला तर बिघडलं कुठे. मुंबई महापालिकेची निवडणूकही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी मोदी सरकारला दिले.
अदानींच्या कार्यालयावर मोर्चा
शिवसेना प्रशासानात नाही आता मोकळं रान वाटत असेल तर आमचा मोर्चा अदानी कार्यालयावर धडकणार आहे. मीच मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. तुमचीही तयारी असेल तर तुम्हीही मोर्चाचं नेतृत्व करा. १६ तारखेला दुपारी ३ वाजता धारावीतून हा मोर्चा निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मग राज्य सरकारने स्वतः विकास करावा
टीडीआर बँक सरकारची असली पाहिजे. अदानी यांना टीडीआर देणार असेल तर राज्य सरकारने स्वत:ची कंपनी स्थापन करावी आणि धारावीचा विकास करावा असे ते म्हणाले. अदानी यांचे घर भरण्यासाठी हा खटाटोप तर करण्यात येत नाही ना, असा सवाल त्यांनी केला. टीडीआरचा दुरुपयोग झाला तर अदानींवर गुन्हा दाखल होणार का? त्यांना तुरुंगात टाकणार का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.