मिरा रोडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर

| Updated on: Jun 25, 2020 | 6:28 PM

मुंबईतील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या  मणक्यातून 3.5 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले (Remove big tumor in spinal cord) आहे.

मिरा रोडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर
Follow us on

मुंबई : मुंबईतील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या  मणक्यातून 3.5 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले (Remove big tumor in spinal cord) आहे. हा रूग्ण कित्येक महिने पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. मीरा रोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली (Remove big tumor in spinal cord) आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरूस्ती राखण्यात अपयशी ठरत आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून सतत काम करावे लागत असल्याने पाठदुखीची समस्या बळावू लागली आहे. लॉकडाऊनच्या या काळावधीत अधिकतास बसून काम करावे लागत असल्याने मुंबईतील एका व्यक्तीच्या मणक्यात गाठ तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भूपेश अंकोलेकर (40) असे या रूग्णाचे नाव असून ते मुंबईत राहणारे आहेत. ही व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिन्यांपासून त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. दुखणं असह्य झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या रूग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. पाठीच्या दुखण्याचे कारण जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा एक्स-रे आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत या व्यक्तीच्या मणक्यात गाठ असल्याचं निदान झालं. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे गरजेचं होते. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करून मणक्यातून गाठ काढली. ही गाठ 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी होती.

‘‘पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत चिटकून होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या काढली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरूपी सुटका मिळाली आहे.’’, असं मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांनी सांगितले.

‘‘मणक्यात ट्यूमर(गाठ) असल्याचे निदान झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढणे हा एकच पर्याय होता. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मला या पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळाली आहे. आता मी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू शकतोय.’’, असं रूग्ण भूपेश अंकोलेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

किडनीचं वजन पाहून डॉक्टरही अवाक, भारतातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया मुंबईत यशस्वी