मुंबई : गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी डॉक्टर शशांक मूळगावकर (Doctor Shashank Mulgaokar dies due to coronavirus) यांचं निधन झालं. 56 वर्षीय डॉक्टर मूळगावकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूळगावकर यांच्या निधनाने गिरगाव परिसरातील नागरिकांना एकच धक्का बसला आहे. शांत, संयमी आणि कार्यतत्पर, मदतीसाठी कधीही धावून येणारे मूळगावकर यांचं कोरोनाने निधन झाल्याचं वृत्त अनेकांना पचनी पडत नाही.
मूळगावकर हे अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉ. मूळगावकर हे बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. अनेक दिग्गज यांच्याकडून उपचार करुन घेत.
गेल्या सहा दिवसांपासून ते श्वास आणि हायपरटेंशनने ग्रासले होते. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मूळगावकर हे झोकून देऊन काम करत होते. दुर्दैव म्हणजे दोन दिवसांनी म्हणजे 3 जून रोजी त्यांचा वाढदिवस होता, मात्र त्याच्या काही दिवस आधीच त्यांना काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मूळगावकर यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 18 मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना 24 मे रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. “एका क्षणी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं जाणवलं. आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करु असं वाटत होतं, मात्र अचानक ते आम्हाला सोडून गेले”, असं मूळगावकरांचा मुलगा पार्थ यांनी सांगितलं. पार्थ सध्या नायर रुग्णालयात प्रशिक्षण घेत आहे.
डॉक्टर मूळगावकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षापासून प्रॅक्टिसला सुरुवात केली होती. बॉलिवूडमधील कपूर फॅमिलीचे डॉक्टर होते. मूळगावकर हे समाजकार्यातही अग्रेसर होते.
(Doctor Shashank Mulgaokar dies due to coronavirus)