मुंबई : मुंबईतील वाहतूकीत महत्वाचा असलेल्या आणि ब्रिटीशकालिन पुलाच्या पुनर्विकासावरुन सध्या सावळागोंधळ सुरु आहे. महानगर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने अंधेरीच्या गोखले पुलाचा पुरता विचका झाल्याचे उदाहरण ताजे आहे. तर लोअर परळच्या पुल आणि गोखले पुलाच्या उभारणीला लागलेल्या प्रचंड विलंबामुळे मुंबईशहरातील जनतेला वेठीला धरण्याचे प्रकार होत आहेत. आता रेल्वे पुलांच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी स्थापलेल्या ‘एमआरआयडीसी’ कडून मुंबई शहरातील एकूण 11 रेल्वे पुलांचा विकास सुरु होता. मात्र आता रेल्वेने मुंबईतील चार पुलांची पुनर्बांधणी आताच करु नका असे पत्र रेल्वेने मुंबई महानगर पालिकेला दिले आहे. त्यामुळे ‘एमआरआयडीसी’च्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त करीत या 100 वर्षांहून जुन्या पुलांचा अपघात होऊन काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी देखील संबंधित रेल्वे अधिकाऱ्यानेच घ्यावी असे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
2018 च्या जुलै महिन्यात अंधेरी रेल्वे स्थानकानजिक गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळून तीन जण ठार झाले होते. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उड्डाण पुलांचे मुंबई आयआयटी तज्ज्ञांच्या मदतीने स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ पुल धोकादायक ठरवून पाडण्यात आला. हा पुल पाच वर्षांच्या विलंबाने आता कुठे सुरु झाला आहे. तर अंधेरीच्या गोखले रेल्वे पुलाचे भिजत घोंगडे अजून कायम आहे. त्यातच आता रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे पुनर्विकास रेल्वेने करायचा की मुंबई महानगर पालिकेने हा वाद निर्माण झाला होता. अखेर रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या शहरी पुलांच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी ‘एमआरआयडीसी’ला काम देण्यात आले. एमआरआयसीने मुंबईतील दहा उड्डाण पुलांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते.
मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ( एमआरआयडीसी-महारेल ) यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामात समन्वय असावा आणि नागरिकांना समस्या भेडसावू नये यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी महारेलचे अधिकारी यांच्यात काल बुधवार ( दिनांक 15 मे ) रोजी बैठक पार पडली. मुंबई शहरातील तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
ऑलिवंट पूल, ऑर्थर पूल, ‘एस’ पूल ( भायखळा ) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने पालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेच्या 24 एप्रिल 2024 च्या पत्रानुसार हे पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणी करण्याची काहीही आवश्यकता नाही. या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन रेल्वेमार्फत 10 ते 15 वर्षांनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मुंबई शहरात सुरू असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च मुंबई महानगर पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. तर प्रत्यक्ष पूल उभारणी, प्रकल्पाची कामे ही ‘महारेल’ या संस्थेमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल ( दादर ) आणि घाटकोपर याठिकाणच्या पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. ही कामे वेगाने करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे.
मुंबईतील करी रोड पूल, माटुंगा ( रेल्वे खालील पूल ), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मुंबईतील 10 उड्डाण पुलांच्या पुनर्विकासाचे काम महारेलला पवई आयआयटीच्या स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडीटनंतर दिले होते. त्यानंतर आमच्यात करार झाला होता. आता रेल्वेचे अधिकार म्हणत आहेत की हे पुल आणि आणखीन काही वर्षे सुरक्षित आहेत. मी देखील रेल्वेचा अधिकारी आहे. यापैकी एक पुल 137 वर्षे जुना आहे. तर उर्वरित दोन पुल 100 वर्षे जुने आहेत. या पुलांना काही होऊन अपघात झाला आणि कोणतीही हानी झाली तर त्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला जबाबादार ठरवावे अशी मागणी महारेलचे सीएमडी राजेश जयस्वाल यांनी टीव्ही 9 मराठी वेबसाईटशी बोलताना केली आहे.
रे रोड पूल – सद्यस्थितीत 77 टक्के काम पूर्ण, हा पूल वाहतुकीसाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता
भायखळा पूल – सद्यस्थितीत 42 टक्के काम पूर्ण, हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरु करण्याचे उद्दिष्ट
टिळक पूल – सद्या आठ टक्के काम पूर्ण
घाटकोपर पूल – सद्यस्थितीत 14 टक्के काम पूर्ण