विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. पण पराभवाला कोणी वाली नसतो म्हणतात. लोकसभा निवडणूक 2024 नंतर महायुतीत हाच प्रत्यय येत आहे. लोकसभा निवडणूकीत राज्यात मोठा उलटफेर झाला. महायुतीला मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने मोठी झेप घेतली. अर्थात या पराभवाचे चिंतन, मंथन सुरु झाले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र ‘द ऑर्गनायझर’मध्ये या पराभवाला अजित पवार यांच्याशी असलेली युती कारणीभूत ठरल्याच्या कानपिचक्या देण्यात आल्या. आता भाजपच्या काही आमदारांमध्ये हीच खदखद असल्याचे दिसून आले.
अजित पवार गट झाला ओझे?
भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे झाले आहे. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे मत आहे. अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे समजते. पराभवाचे खापर आता अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे. भाजपसह शिंदे गटाला हा तिसरा मित्र काही फळला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. अजून याविषयी उघडपणे कोणी बोलले नाही. पण आरएसएसच्या मुखपत्रातून महायुतीमध्ये अजित पवार गटाला सहभागी करुन घेतल्याप्रकरणीत कान उपटण्यात आले आहे.
या मतदारसंघांची दिली यादी
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. यामध्ये माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचे चित्र आहे. इतर मतदारसंघातही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोबत ठेवण्याबाबत करा पुनर्विचार
शिरूर मधील खेड विधानसभा मतदार संघात दिलीप मोहिते पाटील, जुन्नर – अतुल बेनके, आंबेगाव दिलीप ळळसे पाटील आणि हडपसर येथे चेतन तुपे हे चार ही आमदार असताना शिवसेनेचे आढळराव पाटील पराभूत झाल्याचे मत भाजप आमदारांनी व्यक्त केले आहे. या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.