मुंबई : नो एण्ट्रीमधून वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई करत असताना, ट्रॅफिक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (12 एप्रिल) रात्री 8 च्या सुमारास ताडदेव येथे घडली. सानप असं मारहाण झालेल्या ट्रॅफिक पोलिसाचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ट्रॅफिक पोलिसांच्या मारहाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी सुद्धा अनेकदा ट्रॅफिक पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
ताडदेव ट्रॅफिक चौकीचे पोलीस नाइक सानप हे फॉरगिट स्ट्रीट इथे ड्युटीवर असताना रात्री 8 च्या सुमारास नो एण्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहन क्र. MH 01 BY 1629 कारवाई केली. मात्र त्यातील वाहन चालक जशन मुनवानी आणि त्याचे वडील जय मुनवानी यांनी सानप यांना मारहाण केली. यावेळी वाहन चालकाच्या दोन साथीदारांनीही सानप यांना मारहाण केली. सध्या मारहाण करणाऱ्या वाहन चालकावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याचा गुन्हा गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करुन, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याआधीही ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे यांच्यावर दुचाकीस्वार टवाळखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. वाहतूक कारवाई करताना अनेकदा ट्रॅफिक पोलिसांवर आतापर्यंत हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्हिडीओ :