उन्हाच्या झळा आणि रेल्वेस्थानकांवरील पाणी बंदीने प्रवासी तहानेने व्याकूळ

| Updated on: Feb 23, 2023 | 9:02 AM

रेल्वे स्थानकांवर पाणी मिळत नसल्याने उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात स्वत: सोबत पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

उन्हाच्या झळा आणि रेल्वेस्थानकांवरील पाणी बंदीने प्रवासी तहानेने व्याकूळ
Water-Vending-Machine
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : सध्या उन्हाचा तडाका वाढला असून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकांवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या बाटली बंद रेलनीरचा ( RAILNEER )  तुटवडा जाणवत असल्याने प्रवासी ( PASSENGER ) तहानेने व्याकूळ झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील स्टॉलना सध्या अंबरनाथ येथील रेलनीरच्या प्रकल्पातून रेलनीरचा पुरवठा होणे कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वत: जवळ पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

सध्या फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला असून कडक उन्हामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील स्वस्त पाण्याच्या वॉटर वेंडींग मशिन बंद पडल्या आहेत. त्यातच रेलनीरच्या अंबरनाथ येथील प्रकल्पातून बाटली बंद पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे प्रवासी तहानेने व्याकूळ झाले आहेत. रेल्वे स्थानकांवरील आयआरसीटीसीच्या कंत्राटी स्वस्त पाणी विकणाऱ्या मशिन गेली अनेक वर्षे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वत: जवळ पाणी बाळगणे गरजेचे बनले आहे.

अंबरनाथच्या रेलनीर प्रकल्पात मेन्टेनन्सचे काम सुरू आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील स्टॉलवर मिळणारे स्वस्तातील रेलनीर मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आयआरसीटीसीने मध्य आणि पश्चिम रेल्वेला 20 फेब्रुवारीला माहिती दिली आहे. अंबरनाथच्या रेलनीर निर्मिती प्रकल्पाचे मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने येत्या 8 मार्चपर्यंत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात स्वत: सोबत पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

आयआरसीटीसीच्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिन आर्थिक गणित बिघडल्याने बंद पडल्या आहेत. पश्चिम रेल्वेने धर्मादाय योजनेतून वॉटर कूलर बसविले आहेत. मध्य रेल्वेवर पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वॉटर कूलर बसविण्यासाठी टेंडरचे वाटप झाले असले तरी प्रत्यक्षात वॉटर वेंडिंग मशिन लागेपर्यंत पावसाळा सुरू होईल असे म्हटले जात आहे.

उपनगरी रेल्वे स्थानकातून मागणी वाढल्यास दरवर्षी अंबरनाथच्या रेल नीर प्रकल्पातून अपुरा पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे सर्व रेल्वे स्थानकावर लवकराच लवकर वॉटर कुलर बसविण्यात यावेत अशी मागणी होत आहे. ‘रेल नीर’चा पुरवठा अपुरा होत असल्याने प्रवाशांना इतर ब्रँडचे बाटली बंद पाणी मिळावे म्हणून रेल्वेच्या स्टॉलना इतर बँडचे पाणी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली होती. त्यास रेल्वेकडून प्रतिसाद मिळत आहे.