मुंबई : उत्तर भारतीयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौऱ्या रद्द केला. तेच बृजभूषण सिंह काल पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमात आले होते. राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर त्यांचा मान वाढला असता, असं भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हंटलंय. मोठ्या पदावरील लोकांचं काय जोडण्याचं आहे. तोडण्याचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
बृजभूषण सिंह म्हणाले, एक गोष्ट प्रत्येकवेळी चालत नाही. वेळेनुसार सगळ्यांना चालावं लागते. त्यावेळी राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याचं जाहीर केलं होतं. मला वाटलं, महाराष्ट्रात असणाऱ्या उत्तर भारतीयांवर अन्याय झाला होता. उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळं मी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.परंतु, त्यावेळी राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर, ते आमच्या नजरेत मोठे नेते झाले असते.
आम्ही राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला असता. मोठ्या पदावरील व्यक्तींनी जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोडण्याचं नव्हे. आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असतील, तर त्यांना काही समस्या येणार नाही. तो विषय आता संपला आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी अयोध्येला यावं.
राज ठाकरे भेटल्यास त्यांना अयोध्या येण्याचं निमंत्रण देणार आहोत. त्यावेळी उत्तर भारतीयांवर मारहाण झाली होती. त्यामुळं प्रकरण चिघडलं होतं. आता तो विषय संपला आहे. त्यामुळं अयोध्येला कुणीही येऊ शकत, असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. बृजभूषण सिंह काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला संबोधितही केले.