मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाच्या मागचं चौकश्या आणि कोर्ट कचेऱ्यांचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाहीये. आधी सुरज चव्हाण आणि नंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे. या चौकश्या सुरू असतानाच आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता गोत्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. या प्रकरणी वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे वायकर हायकोर्टात गेले होते. पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
रवींद्र वायकर यांचा हा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केला होता. या घोटाळ्याची सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन माहितीही दिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख स्क्वेअर फूटाच्या भूखंडावर रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीत हॉटेल बांधायची परवानगी दिली होती. याप्रकरणी वायकर यांनी महापालिकेची फसवणूक केली होती.
लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर हॉटेलची बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. 11मार्च 2023 रोजी सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला होता. त्यानंतर महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली होती.
त्यानंतर किरीट सोमय्या यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन वायकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोणत्या परिस्थितीत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली होती याचीही चौकशी करणअयाची मागणी सोमय्या यांनी केली होती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.