मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच जेलमधून सुटका झालीय. मुंबई सेशन कोर्टाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांची पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी जामिनावर सुटका केलीय. त्यामुळे ते तब्बल 100 दिवसांनी जेलमधून बाहेर पडले. त्यांच्या जामिनास ईडीच्या वकिलांनी भरपूर विरोध केला होता. पण राऊतांच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे त्यांची जेलमधून सुटका झाली. राऊतांनी जेलमधून सुटून अवघे काही दिवस झाले असताना त्यांची अडचणी वाढवणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
ईडीकडून संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी सुधारीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. ईडीच्या सुधारित याचिकेवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल. विशेष म्हणजे ईडीने गेल्यावेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकेत कोर्टाकडून काही चुका सांगण्यात आल्या होत्या. त्या सर्व चुका दुरुस्त करुन ईडीकडून आता मुंबई हायकोर्टात सुधारित याचिका दाखल करण्यात आलीय.
संजय राऊत यांना गेल्या आठवड्यात विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यांच्या जामिनाला त्यावेळी ईडीकडून प्रचंड विरोध करण्यात आला होता. पण कोर्टाने संजय राऊत यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हणत जामीन मंजूर केला होता.
संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. ईडीने मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करत राऊतांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती.
कोर्टाने त्यावेळी पीएमएलए कोर्टाच्या निकालाच्या ऑर्डरची प्रत वाचली होती. तसेच हायकोर्टाने देखील संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. यावेळी हायकोर्टाने याचिकेतील काही चुका दाखवून दिल्या होत्या. त्यामुळे राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर ईडीकडून आज मुंबई हायकोर्टात संजय राऊतांच्या याचिकेला विरोध करणारी सुधारीत याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल.