मुंबई : मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईसह पुण्यात छापेमारी केली होती. तब्बल 16 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. ईडीने महापालिका अधिकारी, राजकारणी, एजंट आणि मध्यस्थांच्या घरी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे तपासली आहेत. ही छापेमारी करताना ईडीच्या हाती एक डायरी लागली आहे. या डायरीतून धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या डायरीत काही बड्या लोकांची नावे असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील सर्वांचंच टेन्शन वाढलं आहे.
दोन दिवसांपूर्वी ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी छापेमारी केली होती. त्याचवेळी मुंबई महाालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, माजी वैद्यकीय अधिकारी हरिश राठोड आणि माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीही छापेमारी केली होती. ईडीने यांच्यासह एकूण 16 जणांच्या घरी छापेमारी केली होती. त्यात काही मध्यस्थ आणि एजंटांचाही समावेश होता. तब्बल 17 तास ही छापेमारी सुरू होती. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती.
कोव्हिड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली होती. एका मध्यस्थाच्या घरी छापेमारी सुरू असताना ईडीच्या हाती एक डायरी लागली आहे. या डायरीत लाचेचा तपशील आहे. कोव्हिड सेंटरचं कंत्राट घेण्यासाठी कोणत्या पालिका अधिकाऱ्याला किती लाच देण्यात आली, याची इत्थंभूत माहिती या डायरीत नोंदवण्यात आली आहे. त्या पालिका अधिकाऱ्यांची नावेही या यादीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ज्या मध्यस्थाच्या घरी ही यादी सापडली आहे, त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नसल्याची माहितीही समोर आली आहे.
या डायरीतील तपशील पाहून आता ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. कुणाला किती लाच दिली? त्यांचा या घोटाळ्यात काय रोल होता? याचीही चौकशी करण्यात येणार आहे. हे अधिकारी कोण आहेत याचा तपशील मिळू शकला नाही. हे अधिकारी अजूनही पालिकेत सक्रिय आहेत की नाही याचाही तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, ईडीच्या हाती डायरी लागल्याची खबर आल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांचीही चौकशी होणार आहे. वेलरासू अतिरिक्त आयुक्त असताना हा घोटाळा झाला होता. खरेदी विभागतूनच हा घोटाळा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे वेलरासू यांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.