शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची ईडीकडून साडेनऊ तास कसून चौकशी

| Updated on: Oct 30, 2019 | 8:49 PM

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तब्बल साडेनऊ तास कसून चौकशी केली.

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची ईडीकडून साडेनऊ तास कसून चौकशी
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तब्बल साडेनऊ तास कसून चौकशी केली. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध (Raj Kundra connection with underworld) असल्याचा ईडीला संशय असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ही चौकशी (ED inquiry of Raj Kundra) करण्यात आली. कुंद्रा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत व्यावसायिक करार केल्याचा आरोप आहे. मात्र, राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

राज कुंद्रा यांनी ईडीच्या चौकशीनंतर अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत कधीही बोलणं झालेलं नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे राज कुंद्रा यांनी इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रंजीत बिंद्रांवर इकबाल मिर्चीला प्रॉपर्टी डील्समध्ये मदत केल्याचा आरोप आहे.

ईडी रिअल ईस्टेट कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना त्यांना ही माहिती आढळली. या पडताळणीत ईसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांची असून शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे.

राज कुंद्रा यांचं स्पष्टीकरण

‘2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमीनीचे सर्व कागदपत्र माझ्या सीएने तपासली आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. या कंपनीवर कर्जामुळेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, त्यावेळी ही कंपनी माझ्या मालकीची नव्हती. माझ्या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आणि आम्ही या कंपनीसाठी कुठलंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे जे काही आरोप करायचे आहेत, ते या कंपनीच्या मालकांवर व्हायला हवे’, असं म्हणत राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.