BIG BREAKING | सुरज चव्हाण यांना ईडीचं समन्स, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Jun 22, 2023 | 11:15 PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

BIG BREAKING | सुरज चव्हाण यांना ईडीचं समन्स, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, तसेच मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपांप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने नुकतंच सुरज चव्हाण यांच्या घरी छापा टाकला होता. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर आता चव्हाण यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

सुरज चव्हाण यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स

सुरज चव्हाण यांना ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईडीने चव्हाण यांना येत्या सोमवारी 26 जूनला चौकशीचं समन्स बजावलं आहे. या प्रकरणी ईडीने सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना आज चौकशीचं समन्स बजावलं होतं. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकले नाहीत. संजीव जयस्वाल हे करोनो काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते.

ईडी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरावर धाड टाकली. ईडी अधिकाऱ्यांनी दिवसभर चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. ईडी अधिकारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरात गेले होते. त्यानंतर ते रात्री दीड वाजताच घराबाहेर पडले. तब्बल 17 तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली.

ईडीच्या हाती तब्बल दीडशे कोटीच्या संपत्तीचे कागदपत्रे

या कारवाईत ईडी अधिकाऱ्यांना तब्बल दीडशे कोटीच्या संपत्तीचे कागदपत्रे मिळाली. यामध्ये 50 स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. तसेच 68 रुपयांच्या रोख रकमेसह अडीच कोटींचे दागिने अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जातोय. ईडी अधिकाऱ्यांच्या हाती आता सुरज चव्हाण यांचे व्हाट्सअॅच चॅटही लागले आहेत. सुरज चव्हाण यांच्या सांगण्यावरुन सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट मिळालं, असा ईडीला संशय आहे. ईडी त्या दृष्टीकोनातून तपासही करत आहे.

ठाकरे गटाची शिंदे सरकार आणि भाजपवर टीका

एकीकडे ईडीकडून कारवाई सुरु आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. खासदार संजय राऊत यांनी तर थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी सुरज चव्हाण यांची भेट घेऊन शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.