मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (ED summons to Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने आता शिवसेनेची अवस्था अधिकच बिकट होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. गुवाहाटीत बसून ट्विट करत ते शिवसेनेवर शाब्दिक हल्ले करीत आहेत. दुसरीकडे या शाब्दिक हल्ल्यांना तसेच प्रत्त्युत्तर शिवसेनेतर्फे संजय राऊत देत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपा असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाचे नेते यावर उघडपणे काहीही बोलत नसले तरी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी त्यांची खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. या सगळ्यात आता संजय राऊत काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवले असून उद्या चौकशीला बोलावले आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आधीच शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. त्यात आता ही नोटीस आल्याने भाजपाचा हस्तक्षेप ठळक झाला आहे. सातत्याने शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
ईडीच्या नोटिशीची चर्चा सुरू असताना संजय राऊत सामनाच्या कार्यालयात होते. याविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी सांगितले, की ईडीची नोटीस अद्याप मला मिळालेली नाही. संध्याकाळपर्यंत जर ती मिळाली, तर ईडीकडे वेळ वाढवून मागणार आहे. पक्षाचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याची चौकशी पुढे ढकलावी, अशी विनंती करणार आहे. ईडीने त्यांची विनंती मान्य केली, तर त्यांची चौकशी पुढे ढकलली जाऊ शकते, अन्यथा त्यांना ईडीसमोर हजर राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.