मुंबई | 9 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सकाळपासूनच तळ ठोकला आहे. ईडीच्या धाडसत्राने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विरोधकांनी राजकीय सूडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण त्याला तोडीसतोड जवाब दिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात ज्याला कर नाही त्याला डर कसला अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अजून मुख्यमंत्री…
ईडी तर केंद्राच्या अख्त्यारीत
वायकर यांच्यावरील ईडीच्या छापेमारीविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी ईडी ही काही राज्याच्या अखत्यारीत नाही तर केंद्राच्या अखत्यारीत असल्याची तात्काळ प्रतिक्रिया दिली. विरोधकांच्या सूडबुद्धी राजकारणाच्या आरोपाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. कर नाही त्याला डर कशाला, होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी, अशी प्रतिक्रिया त्यांनी लागलीच दिली. हे सरकार सूडबुद्धीने वागत नाही. आकासापोटी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. करणार नाही, असे ते म्हणाले.
संख्याबळ कोणाकडे आहे?
शिवसेना आमदार अपात्र याचिकांवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल सुनावतील. या निकालाचे राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच रवींद्र वायकर यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप विरोधी खेम्यातून करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. संख्याबळ कोणाकडे अधिक आहे, असा सवाल करत विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळले.
काय आहे प्रकरण
जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणात ईडीने वायकर यांच्यावर ही कारवाई केली. सकाळपासूनच त्यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु झाली. वायकर यांच्या मातोश्री क्लबसह चार ठिकाणी छापा टाकण्यात आला. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा ठपका वायकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावातील जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात येत आहे.