Mumbai Hoarding Collapse : जीव घेणारे होर्डिंग नीट दिसण्यासाठी मोठ्या वृक्षांना पण सोडले नाही; या अमानुष पद्धतीने 8 झाडांचा दिला बळी

| Updated on: May 14, 2024 | 3:02 PM

14 जणांचे बळी घेणाऱ्या अवैध होर्डिंगबाबत अजून काही अपडेट समोर येत आहे. मुंबईतील घाटकोपर येथील या अवैध होर्डिंगसाठी आजुबाजूच्या 8 झाडांची अमानुष पद्धतीने कत्तल करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Hoarding Collapse : जीव घेणारे होर्डिंग नीट दिसण्यासाठी मोठ्या वृक्षांना पण सोडले नाही; या अमानुष पद्धतीने 8 झाडांचा दिला बळी
होर्डिंगसाठी वृक्षांचा बळी
Follow us on

मुंबईतील घाटकोपर परिसरात विशालकाय होर्डिंग कोसळल्याने काल 14 जणांना प्राण मुकावे लागले. तर 74 जण जखमी झाले आहेत. या अवैध होर्डिंगविरोधात बीएमसी अधिकाऱ्यांना अगोदरच माहिती होती. त्याविषयीची चौकशी सुद्धा झाल्याचे समोर आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेनुसार 40 बाय 40 फुटाच्या होर्डिंगला परवानगी देण्यात आली होती. सोमवारी दुर्घटनेनंतर होर्डिंग 120 बाय 120 चे असल्याचे समोर आले आहे. त्यातच हे होर्डिंग दिसावे यासाठी आजुबाजूच्या झाडांना विषारी इंजेक्शन देऊन जाळण्यात आल्याचे समोर आले आहे.

गेल्या डिसेंबरमध्येच तक्रार

महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाने डिसेंबर 2023 मध्येच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या होर्डिंगची देखभाल आणि व्यवस्थापन करणारी एजन्सी ईगो मीडियाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. बीएमसी अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यापूर्वीच, एप्रिल महिन्यात पोलिसांसोबत संपर्क केला होता. तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत सुबाभुळ, पिंपळ आणि इतर वृक्ष अचानकच सुकून नष्ट झाल्याचे म्हटले होते.

होर्डिंगला अडथळे ठरणाऱ्या वृक्षाचा बळी

बीएमसीच्या उद्यान विभागानुसार, पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक झाडे सुखण्याच्या दोन वेगवेगळ्य घटना घडल्या. पहिली घटना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात घडली होती. तर या वर्षी अशीच घटना एप्रिलमध्ये उजेडात आली. तपासणीत या झाडांच्या मुळांना छिद्र पाडत त्यात विषारी औषध दिल्याचे समोर आले. झाडं सुकून ती तोडण्यात यावी यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचे समोर आले. होर्डिंग दिसण्यात अडथळा येऊ नये यासठी छेदा नगर जंक्शन भागातील 8 मोठ्या झाडांना विष देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त भुषण गगरानी यांनी दिली. यासंबंधी बीएमसीने गुन्हा पण नोंदविला आहे.

14 जणांचा बळी गेल्यानंतर आली जाग

  1. सोमवारी ही दुर्घटना घडली. त्यानंतर मुंबई महापालिकेने होर्डिंगचे व्यवस्थापन करणाऱ्या ईगो मीडिया आणि त्याचा मालक भावेश भिडे याच्याविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पालिकेने या मीडिया संस्थेचे इतर तीन होर्डिंग काढण्याची नोटीस बजावली. त्यानंतर लागलीच तीन होर्डिंग काढण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे होर्डिंग जवळपासच आहेत. कोसळलेले होर्डिंग पेट्रोल पंप असल्याने हटविण्यात अडथळे येत आहेत.
  2. तर जीआरपीचे आयुक्त रवींद्र शिसवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. रेल्वेच्या जमिनीवर होर्डिंग लावण्याची परवानगी कधी आणि कोणी दिली. त्यासाठी नियमांचे पालन करण्यात आले की नाही, याचा तपास करण्यात येत आहे.