एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील वाद विकोपाला, मंत्रिमंडळ बैठकीतून दादा अचानक निघाले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 11, 2024 | 11:25 AM

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील वाद विकोपाला, मंत्रिमंडळ बैठकीतून दादा अचानक निघाले, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

CM Eknath Shinde-Ajit Pawar Dispute : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग- विरार कॉरिडोअर प्रकल्पाला अजित पवारांनी मंजुरी नाकारल्याने हा वाद झाल्याचे बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात हा मोठा वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या अलिबाग-विरार प्रकल्पाला मंजुरी देण्यास अजित पवारांनी परवानगी नाकारली. मात्र या प्रकल्पाला अजित पवारांनी परवानगी का नाकारली? यावरुन त्या दोघांमध्ये वाद विकोपाला गेला.

जर अर्थ खात्याकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही, तर मग मुख्यमंत्र्‍यांच्या अधिकार क्षेत्रातून या प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला. एकनाथ शिंदेंच्या टोल्यामुळे अजित पवार हे नाराज झाले आणि मंत्रिमंडळ बैठक शेवटच्या टप्प्यात असताना ते यातून निघून गेले, असे बोललं जात आहे.

अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

आता यावर अजित पवारांनांही स्पष्टीकरण दिले आहे. मी कॅबिनेट बैठकीतून लवकर निघून गेलो नाही. कॅबिनेटमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमासाठी निघालो. उदगीर येथे नियोजित कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यामुळे मी शिंदे-फडणवीसांना सांगून निघालो. त्यामुळे मी राज्य मंत्रिमंडळ बैठक १० मिनिटात सोडली ही माहिती संपूर्णपणे खोटी आहे, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

संजय राऊतांची टीका

दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. महायुतीत हा जो प्रकार आहे, त्यात कधीच अलबेल नाही. हे सर्वजण शिवसेना, राष्ट्रवादी तोडायची म्हणून एकत्र आले आहेत, बाकी काहीही नाही. हे सरकार एकमेकांच्या छाताडावर बसत आहेत. तुम्ही आतमध्ये कॅमेरे लावले पाहिजे, मग तुम्हाला अजून खूप काही कळेल. त्यांच्यात सुरुवातीपासूनच वाद आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.