मुंबई : संघर्षानंतर शिंदे फडणवीस सरकार आले आहे. आता विकास थांबणार नाही. मेट्रो तीनचा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी फायदाच होणार आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली, या कार्यक्रमप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मेट्रोचे फायदे सांगत असतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही टोले लगावले. मेट्रो तीनचा हा प्रकल्प साडे 33 किलोमीटरचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. 17 लाख प्रवासी यामाध्यमातून ये-जा करणार आहेत. साडे सहा लाख गाड्या ज्या आता रस्त्यावरून धावणार नाहीत. लाखो लीटर इंधनाची बचत होणार आहे. पर्यावरण तसेच वेळदेखील वाचणार आहे. लोकलचा (Mumbai local) प्रवास करताना अतिशय त्रास लोकांना होतो. मात्र हा 33 किलोमीटरचा प्रवास आरामदायी होणार आहे, असे शिंदे म्हणाले.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या प्रकल्पाला मान्यता मिळाली. त्या पाच वर्षांच्या काळात प्रकल्पाने चांगली प्रगती केली. मी ही त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होतो. अनेकांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विघ्नहर्त्याचे आगमन होणार आहे, त्यामुळे अडथळे दूर होतील, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. वायूप्रदुषण दूर होईल, रस्त्यावरची वाहन कमी होतील. यानिमित्ताने राजकीय प्रदुषणही बंद झाले आहे. शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणे आपले काम आहे, असे ते म्हणाले.
प्रकल्पाच्या तीनही बाजूने झाडे आहेत. लोकांच्या मताचा विचार करून न्यायालयानेही हिरवा झेंडा दाखवला. आव्हानात्मक कामे असतात, त्याला आपण सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जिथे कनेक्टिव्हिटी नाही, तिथे कनेक्टिव्हिटी देणारा हा प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम असेल तर कोणी स्वत:च्या गाड्या बाहेर काढणार नाहीत, असे ते म्हणाले. अधिकारी अश्विनी भिडे यांचेही यावेळी त्यांनी कौतुक केले.
कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. पूर्ण बॅटिंग नाही. अडीच वर्षच आहेत. त्यामुळे अधिक काम करायचे आहे. फडणवीसांना पाच वर्षाचा अनुभव आहे. आणि आता तर मीदेखील त्यांच्या सोबत आहे. आधी एकच भारी पडत होता. आता एक से भले दो आहे. आम्ही कुठेही राजकारण करणार नाही. मात्र सर्वसामान्यांचे हे सरकार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. आधीच हे सरकार यायला हवे होते, असे लोकांना वाटते, असा दावा त्यांनी केला.