मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलं आहे. आता शिवालयावरही शिंदे गटाकडून हक्क सांगितला जाणार आहे. तसेच शिंदे गटाकडून शिवसेना भवनही ताब्यात घेतलं जाऊ शकतं, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना भवनावर असंख्य शिवसैनिक जमले आहेत. स्वत: उद्धव ठाकरेही शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. शिवसेना भवन हातचं जाण्याची उद्धव ठाकरे यांनाही भीती असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिंदे गटाने वेगळा दावा करून ठाकरे गटाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिरासारखं आहे, असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना भवनाबाबतची शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना प्रॉपर्टी वाटत असली तरी आम्ही त्या रस्त्याने गेल्यावर शिवसेना भवनाला नमनच करू. ज्यांना पैशाचा लोभ आहे. त्यांनी बघावं. आमचं ते काम नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. तोच आमचा अजेंडा आहे, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
काही लोकांना शिवसेना भवन प्रॉपर्टी वाटते. आम्हाला तसे वाटत नाही. त्यामुळे आम्ही त्याला हात घालणार नाही. शिवसेना भवनात बाधा येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करू, असं शिरसाट यांनी सांगितलं.
शिवसेनेने कोणत्याही शाखा विकत घेतलेल्या नाहीत. ट्रस्टच्या माध्यमातून घेतल्या असेल तर ती ट्रस्टची प्रॉपर्टी असेल. मी आमदार आहे. माझंही कार्यालय आहे. माझ्या त्या कार्यालयाचाल शिवसेना हेच नाव राहील. कार्यालयांची आदलबदल होणार नाही. त्यासाठी भांडणं होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
आमच्यांमध्ये शाखांचा झगडा नाहीये. तुम्ही झगडा का लावत आहात? ते सर्व आमचे शिवसैनिक आहेत. आम्ही एकमेकांची डोकी फोडणार नाही. आम्ही शिवसैनिकांना समजावू, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी 56 आमदारांना व्हीप बजावण्यात आल्याचं स्पष्ट केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा व्हीप बजावण्यात आला आहे. ज्यांना ज्यांना व्हीप बजावण्यात आला. त्यांना त्यांना व्हीप पाळावाच लागेल. व्हीपचं उल्लंघन करणाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असा इशाराच प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या 15 आमदारांना व्हीप पाळावा लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.